सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 1
भारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जगातील प्रत्येक देशाचा इतीहास हा काहीना काही सांगून जातो आणि त्यातल्या त्यात भारताचा इतिहास म्हटल्यानंतर तो जेवढा पुरुषांच्या उज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारून गेला आहे तेवढाच स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने भारतीय इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली आहेत. परंतू आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान अजून मिळालेला नाही. आज भारत 21 व्या शतकात मार्गक्रमण करत आहे. गेल्या दीडशे वर्षात भारताने कमालीची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती केली आहे. परंतु या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचाराचे स्मरण आपण कितपत करतो ? हे महत्वाचे आहे आणी त्यातच विकासाच्या आणि प्रगतीच्या गप्पा करताना आपण या महामानवांच्या विचाराकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करतो.
महात्मा ज्योतीराव फुलेंच्या जीवनात एक अशी घटना घडली की, एके दिवशी त्यांच्या एका ब्राम्हण मित्राने त्यांना लग्नाचे आंमत्रण दिले त्यात फुले गेलेही मिरवणूकीत चालत असतांना फुलेंना एका ब्राम्हणाने मोठया शब्दात दरडावून सांगीतले की, अरे ऐ कुणबटाच्या पोरा आम्हा ब्राम्हणाबरोबर चालतोस. तुझ्या स्पर्शाने आम्हाला विटाळ होतो. तू आमच्या मागून चाल !! जोतीरावांना त्याचा धक्का बसला. त्यांनी घरी आल्यावर वडिलांना लगेच घडलेला प्रकार सांगीतला. वडीलांना जे उत्तर दिले त्यामुळ जोतीरावांचे समाधान झाले नाही. त्यावेळी त्यांनी वैदीक ब्राम्हणी धर्मातील बर्याच ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मुक्त करायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम विद्येचे ज्ञान देणे आवश्यक आहे. कारण विद्या हा पाया आहे. कोणत्याही सुधारणेचा विद्या हा पाया आहे. त्यांना असे कळून चुकले की, पहिल्यांदा स्त्री वर्गातच विद्येचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उध्दारी ” या उक्तीच्या अनुषंगाने प्रथम स्त्री वर्गात शिक्षणाचा प्रसार करावयाचा, परंतु मुलींची शाळा उघडण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नी सावीत्रीबाईंना लिहीणे वाचणे शिकवून एक सर्वश्रेष्ठ शिक्षिका बनविली. सनातन्यांचा बाले किल्ला समजल्या जाणार्या पुण्यातच फुलेंनी 1 जानेवारी 1848 साली बुधवार पेठेतील भिडयांच्या वाडयात प्रथम शाळा सुरू केली व ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले ही भारताची पहिली शिक्षिका ठरली. शिक्षिणासाठी त्यांना आपल्या कुटूबियांना सोडावे लागले. त्या आपल्या उद्दीष्टांच्या प्रति एकनिष्ट असल्यामुळे न डगमगता महिलांच्या शिक्षणासाठी बहुजनांच्या विकासासाठी जीवनभर शेण, दगडांचा मारा सहन केला.
भारतात तत्कालीन काळात म्हणजेच दिडशे वर्षापूर्वी वैदिक ब्राम्हणी धर्मात महिलांना शिक्षित करणे किंवा त्यांना ज्ञान देण्यावर बंदी होती. कारण की, मनुस्मृती या विकृत ग्रंथाचा फार मोठया प्रमाणावर प्रभाव होता. परंतु ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरूध्द बंड पुकारण्याचे पवित्र कार्य राष्ट्रपिता जोतीराव आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका व समाजसेविका झाल्या. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व साहीत्यीक योगदान खूप मोठे आहे. फुले दांपत्यांनी पुण्यात सुरू केलेली पहिली शाळा ही भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल. जेव्हा फुलेनी शाळा सुरू केली त्यावेळेस ब्राम्हणांना ही शाळा शुद्रांनी सुरू केली, असे समजले त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईला शाळेत जातांना त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकणे, अचकट भाषेचा प्रयोग करणे, निंदानालस्ती करणे असे षंडयंकारी प्रकार सुरू केलेे. परंतु त्या न डगमगता त्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्ये पुढे अविरत चालूच ठेवले.
क्रांतीज्योती सावित्रीबाईच विद्येची खरी देवता :-
सामान्य बहुजन समाजाच्या मनावर आणि मेंदूवर प्रचलित धर्म व्यवस्थेने आणि तिच्या ठेकेदारांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजवर भारतात धर्म व्यवस्थेचे ठेकेदार जे सांगतील तेच लोकांना सत्य वाटत आले आहे. कारण आपल्या देशात विचार आणि चिकित्सा करायला बंदी आहे ? हे असं का ? ते तसं का ? असले प्रश्न विचारायचे नसतात. “नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ” कधी शोधू नये असही धर्माने सांगून ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस परंपरेच्या नियंत्रणात राहतो. स्वत:चा मेंदू वापरत नाही. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण असा प्रश्न त्याला पडत नाही. आणि पडलाच तर कशाला मेलेली मढी उकरून काढताय म्हणून तो दुसर्यानाच दोष देत बसणार. परंतु फुले दाम्पत्याच्या विचाराने जागृत झालेला बहुजन मात्र स्वताचा मेंदू वापरणारर आणि विचार ही करणार. त्यामुळे त्याला चिकित्सा ही करावीच लागणार. आणि चिकित्सा क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल धर्म मार्तंड किंवा कुणी इतरांनी त्याला विरोध करायचे कारण नाही. तर सांगायचा मुद्दा असं कि आजवर चिकित्सा न केल्यामुळेच बहुजन समाज गुलामगिरीत अडकून पडला आहे. आणि होय बा! वृत्तीमुळे तर तो या दलदलीत खोल रुतत चालला आहे. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण होवू शकते याचा थोडा चिकित्सक पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. कारण तमाम बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली ती महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांनीच. पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. परंतु ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रतिमा मात्र नसतात आणि अशा शाळा, महाविद्यालये किंवा संस्थामधून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली जाते, मात्र ज्या सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचले त्यांची साधी आठवण ही कोणाला होवू नये ? पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई सर्वश्रुत आहे. परंतु पहिली स्त्री शिक्षिका कशी घडली याचा कितीजण गांभीर्याने विचार करतात ? ज्यांना देवावर श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर ठेवावी. त्यांच्या भावना मला दुखवायच्या नाहीत किंवा त्यांना श्रद्धेचा जो अधिकार आहे तो आम्हाला नाकारायचा नाही. परंतु ज्या माऊलीने आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तीच आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तीच आमची खरी विद्येची देवता आहे. कारण जर सावित्रबाई आणि जोतीराव घडले नसते तर कदाचित भारत आजही अशिक्षित असता. या दाम्पत्यानेच शैक्षणिक क्रांती घडवली हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही.
सावित्रीबाईचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य :-
1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरु केली. या शाळेत एकूण सहा मुली होत्या, 4 ब्राम्हण, 1 धनगर आणि 1 मराठा.15 मे 1848 रोजी शुद्रती शूद्रांच्या मुलामुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरु केली. त्यानंतर पुणे परिसरात सुमारे 20 शाळा सुरु केल्या.28 जानेवारी 1853 रोजी महात्मा फुलेंच्या साथीने बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तारुण्यात चुकून पाय घसरल्यामुळे, किंवा समाजातील इतर लोकांच्या अत्याचाराला बळी पडल्यामुळे ज्या स्त्रिया गर्भवती राहिल्या आहेत त्यांनी आपल्या इथे येवून मुलांना जन्म द्यावा अशी भूमिका फुले दाम्पत्याने घेतली. त्यामुळे शेकडो निरपराध मुलांचा जीव वाचला. 1854 रोजी 41 कवितांचा काव्य संग्रह प्रकाशित केला.1873 ला काशीबाई या विधवा ब्राम्हण महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करून तिच्या मुलास दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंताचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ करून त्याला डॉक्टर बनवले.1873 ला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत सक्रीय सहभाग.1876-77 ला महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळात त्यांनी ठिकठिकाणी सुमारे 2000 मोफत अन्नक्षेत्र केंद्र सुरु केली. आजच्या नाकर्त्या सरकारलाही हे कधी जमले नाही.7 नोव्हेंबर 1892 ला बावन्नकशी सुबोध रत्नाकर आणि 1892 लाच मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे ही पुस्तके प्रकाशित केली.1893 ला सासवड येथे भरलेल्या सत्यशोधक परिषदेच्या सावित्रीमाई अध्यक्षा होत्या.
सावित्रीबाईचे परखड विचार :-
सावित्री माईंनी थोडेच परंतु अत्यंत परखड लेखन केले आहे. अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करताना सावित्रीमाई लिहितात :
धोंडे मुले देती ! नवसा पावती !!
लग्न का करती ! नारी-नर !!
केशवपन किती हृदयद्रावक असते त्याचे वर्णन करताना त्या लिहितात :
का हो बाबा, मी तुमची लाडकी !
का करिता मला बोडकी ?
150 वर्षापूर्वीच त्यांनी इंग्रजीचे महत्व ओळखले होते. ते पटवून सांगताना सावित्री माई लिहितात :
इंग्रजी माऊली ! इंग्रजी वैखरी !!
शूद्रांना माऊली ! मनोभावे !!
इंग्रजी माऊली ! तोडते पशुत्व !!
देई मनुष्यत्व ! शुद्रलोका !!
इंग्रजी शिकुनी ! जातीभेद मोड !!
भटजी भारुडा ! ऐकुनिया !!
महाराणी ताराराणीच्या पराक्रमाबद्दल सावित्रीबाई म्हणतात :
ही एकच शूर रणगाजी ! छत्रपती ताराबाई !!
शिवधनु प्रतापी माझी ! वीरांची रण देवाई !!
अशा प्रकारे परखड लेखन करून सावित्री माईंनी आपल्या विचाराने आणि कार्याने बहुजन चळवळीला एक निश्चित दिशा दिली. आज बहुजन समाज आणि विशेषतः सर्व स्त्रिया अनेक क्षेत्रात उज्वल यश संपादन करताहेत त्याचे मुख्य श्रेय फुले दाम्पत्याचे आहे.
दि. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये वयाच्रा 63 व्या वषी जोतीराव फुले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. जोतीरावांच्या अंत्ययात्रेस त्यांचे सगेसोयरे आडवे आले. दत्तक पुत्र यशवंताला टिटवे धरायला विरोध केला. भारताच्या इतीहासात प्रथमच घडलेली ही क्रांतीकारक घटना होय. स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली ही एकमेव महीला भारतात होवून गेली.
अशा या माऊलीने 10 मार्च 1897 आपल्या बहुजन समाजाला आपल्या छत्रछायेपापासून पोरके केले. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत झटणार्या क्रांतीज्यीती सावित्री माई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा